प्रिय विजयाताई,
दि. ८ जुलैला तुमच्या कुटुंबकथा सकाळी वाचायला सुरुवात केली आणि दुपारी अक्षरश: न राहवून इतक्या सुरेख कथा लिहित्या हाताच्या मालकिणीशी बोलूया तरी, म्हणून तुम्हाला फोन केला. तुमच्याशी बोलून आनंद वाटला, पण हे 'ग्रीटिंग' ही पाठवावे वाटले.
तुमच्या कथा (कथुल्या) ह्या मला आणि माझ्या मुलीला मराठीतल्या 'चिकन सूप' वाटतात. तुमची जवळजवळ सर्वच कथांची पुस्तकं आम्ही वाचनालयातून आणून वाचली आणि तीन-चार संग्रहीसुद्धा ठेवली. कधीही लहर आली की मी आणि ती तुमच्या कथा वाचतो; आणि खरंच सांगते, वाचल्यावर खूप प्रसन्न वाटतं.
माझी मुलगी इंग्रजी शिकलेली नि सगळं इंग्रजी वाचणारी असूनही तिला तुमची सर्व पुस्तकं आवडतात, ह्याची मला गंमत वाटते आणि आनंदही होतो. आता ६ ऑगस्ट रोजी पुढील शिक्षणासाठी ती परदेशात जातेय. मास्टर्स इन इंजिनियरिंग मॅनेजमेंट करायला. तिला मी विचारलं, बाळा, तुला तिथे जाण्याकरिता काय घेऊ?
तर तिने मला काय बरं सांगावं?... "विजयाताईंची पुस्तकं दे!" यातच तुमच्या कथांची सशक्त ग्रेट उंची जाणवते.
विजयाताई, अशाच लिहित्या राहा.
- ऊर्मिला कोचरेकर